
नांदेड, 27 जून (हिं.स.)।
पाणीपुरवठा करणाऱ्या पैनगंगा नदीतील पाण्याची पातळी घटल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी दिली.
शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या धनोडा येथील पैनगंगा नदीवरील जलस्रोतावर शहराची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे नदीतील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी दिघडी बंधाऱ्यातून पुढील दोन दिवसांत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढून माहूर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नगराध्यक्ष दोसानी यांनी धनोडा येथील पाणीपुरवठा विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणेला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पाणीपुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी यंत्रणा सतर्क राहून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis