
मुंबई, 27 जून (हिं.स.) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या एका सार्वजनिक कार्यक्रमातील वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत प्रशासनिक निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
एका हिंदू संमेलनात सहभागी होत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या संस्थापकांविषयी गौरवोद्गार काढल्यामुळे सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने आपल्या पदाच्या मर्यादा आणि निष्पक्षतेचे भान राखणे आवश्यक असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. अशा कार्यक्रमांना अराजकीय म्हटले जात असले तरी त्यामागील उद्दिष्टे आणि पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास त्यांचे राजकीय स्वरूप स्पष्ट होते, असा त्यांचा दावा आहे.
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटनेला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे, मात्र सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही विचारसरणीची सार्वजनिकरीत्या बाजू घेणे योग्य नाही. अशा भूमिकांची आवश्यकता असल्यास अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात प्रवेश करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच भविष्यात इतर विचारसरणीच्या कार्यक्रमांमध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग झाल्यास सरकारची भूमिका काय असेल, असा प्रश्न त्यांनी विचारला. 2012 मधील एका प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी प्रशासनाच्या पूर्वीच्या कारवाईची आठवणही करून दिली.
दरम्यान, विश्वास नांगरे पाटील हे कार्यक्षम अधिकारी असल्याचे नमूद करताना, त्यांनी कोणत्याही राजकीय किंवा वैचारिक मंचावर निष्पक्षतेचे भान राखावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule