
चंद्रपूर, 30 जून (हिं.स.) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत शासकीय आश्रम शाळा, पाटण (ता. जिवती) येथे शैक्षणिक सत्र 2026-27 चा प्रवेशोत्सव कार्यक्रम मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, तहसीलदार रूपाली मोगरकर, गटविकास अधिकारी दोडके, तसेच सरपंच सीताराम मडावी, भीमराव मडावी, भीमराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बँड पथकाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच दहावीमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पालकांना नियमितपणे मुलांना शाळेत पाठवण्याचे आवाहन करत, विविध कारणांनी विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो, असे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांना कौशल्याधारित उपक्रमांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी करून स्वच्छता, सुविधा व शैक्षणिक वातावरणाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी शाळेतील मॅथ्स लॅबचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आधीपासून सुरू असलेल्या ॲस्ट्रोनॉमी लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आधुनिक शैक्षणिक सुविधांचे कौतुक करण्यात आले.
प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी माहिती देताना सांगितले की, मागील दोन वर्षांपासून शाळेचे पालकत्व स्वीकारून आदिवासी विकास विभागाच्या निधी तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. लवकरच शाळेत अत्याधुनिक डिजिटल लायब्ररी उभारण्यात येणार असून प्रत्येक वर्ग डिजिटल करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मारडा (मोठा) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतही अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभात फेरी काढण्यात आली. विशेष आकर्षण म्हणून सजविलेल्या बैलबंडीचे सारथ्य स्वतः अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव