

मुंबई, 30 जून (हिं.स.) : चेंबूर परिसरातील डायमंड उद्यानाजवळ मंगळवारी दुपारी सुमारे 2.58 वाजता एका शाळेच्या बसवर पिंपळाचे जुने व मोठे झाड कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. मृत विद्यार्थ्याचे नाव विहान श्रीवास्तव (वय 11) असे असून जखमी विद्यार्थ्यांवर झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांच्या उपचारांची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली.
या अपघातावेळी बसमधील एकूण 13 विद्यार्थ्यांना स्थानिक नागरिक, चालक, वाहक तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यालगतचे जुने पिंपळाचे झाड अचानक उन्मळून धावत्या शाळेच्या बसवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
जखमींपैकी एक विद्यार्थिनी उपचारानंतर घरी पाठविण्यात आली असून एक विद्यार्थी अतिदक्षता विभागात दाखल आहे. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, महापौरांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून झाडांची देखभाल, पावसाळापूर्व छाटणी तसेच परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली जाणार आहे. निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या दुर्दैवी घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule