लातूर - अहमदपूर येथील दोघांविरुद्ध हद्दपारीची कारवाई
लातूर, 30 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करणे, या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच
पोलीस कारवाई


लातूर, 30 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करणे, या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलामार्फत सातत्याने कठोर कारवाया करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अहमदपूर पोलीस ठाण्याने सादर केलेल्या प्रस्तावांच्या आधारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन सराईत इसमांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५६ अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

अहमदपूर पोलीस ठाण्याने सादर केलेल्या प्रस्तावानुसार अमोल अशोक तरडे (रा. थोडगा, ता. अहमदपूर, जि. लातूर) याच्याविरुद्ध सन २०२० ते २०२५ या कालावधीत मारहाण, जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ, महिलांचा विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्हे, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील गुन्हे तसेच सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक उघडपणे तक्रार करण्यास व साक्ष देण्यास धजावत नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

तसेच अनिता राम जाधव (रा. भारत कॉलनी, अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर) हिच्याविरुद्धही सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याने तिच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५६ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. संबंधित प्रस्तावाची सखोल छाननी करून तिच्याविरुद्धही हद्दपारीचा आदेश पारित करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रस्तावांवर उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदपूर यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. संबंधित आरोपींचा गुन्हेगारी इतिहास, उपलब्ध पुरावे, गोपनीय चौकशी अहवाल तसेच कायदा व सुव्यवस्थेवर होणारा परिणाम यांचा सर्वंकष विचार करून उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अहमदपूर डॉ. मंजुषा लटपटे यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५६ अन्वये दोन्ही सराईत इसमांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिनांक ०४ जून २०२६ रोजी पारित केले आहेत.

सदर आदेशानुसार संबंधित हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यानंतर निर्धारित मुदतीत लातूर जिल्ह्याची हद्द सोडणे बंधनकारक असून ०४ जून २०२६ ते ०४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय लातूर जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. तसेच हद्दपारीच्या कालावधीत वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती संबंधित पोलीस ठाण्यास देणे व नियमानुसार हजेरी लावणेही बंधनकारक राहणार आहे.

लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध भविष्यातही मुंबई पोलीस अधिनियमातील प्रतिबंधात्मक तरतुदींचा प्रभावी वापर करून कठोर कारवाई सातत्याने करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande