
कोल्हापूर, 30 जून (हिं.स.)। हरित महाराष्ट्र आयोग अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिवर्षी 5 लाख वृक्ष लागवड याप्रमाणे 21 वर्षात टप्प्या टप्प्याने म्हणजेच 1 कोटी 5 लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या लागवडीसाठी संबंधित यंत्रणांनी येत्या 13 जुलैपर्यंत वृक्ष लागवडीचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने शाहूजी सभागृहात आज जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्री राठोड म्हणाले, जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिमेला गती द्यावी. त्याचबरोबर संबंधित विभागांना वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने देण्यात आलेले उद्दिष्ट केवळ पूर्ण करू नये तर ते वृक्ष जगावेत, त्यांची जोपासना योग्य पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही केल्या.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी किशोर येळे यांनी जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने करण्यात येणारी सर्व रोपे (वृक्ष) सामाजिक वन विभागामार्फत मोफत देणात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, इचलकरंजी मनपा उपायुक्त नंदू परळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, पोलीस उपाधिक्षक (गृह) श्रीमती सुवर्णा पक्की, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत उगले, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका दळवी, पाटबंधारे विभागाच्या उप कार्यकारी अभियंता आरती बारटके, महावितरणचे सहाय्यक अभियंता अनुराग डोईजड यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar