रेवदंडा पूल आकार घेतोय; किनारपट्टीचा प्रवास होणार सुसाट
रायगड, 04 जून (हिं.स.)। : बहुप्रतीक्षित रेवस–रेड्डी सागरी महामार्गावरील रेवदंडा खाडी पुलाच्या उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रायगडसह संपूर्ण कोकणातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त के
1,200 crore Revdanda bridge is taking shape; coastal travel will be smooth


रायगड, 04 जून (हिं.स.)। : बहुप्रतीक्षित रेवस–रेड्डी सागरी महामार्गावरील रेवदंडा खाडी पुलाच्या उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रायगडसह संपूर्ण कोकणातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून हा पूल उभारला जात असून, अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीकडून बांधकामाची जबाबदारी पार पाडली जात आहे. या पुलासाठी शासनाकडून सुमारे १ हजार २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रेवस–रेड्डी सागरी महामार्ग हा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन किनारी जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. सुमारे ४९८ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग समुद्रकिनाऱ्यालगत धावणार असून, प्रवाशांना निसर्गरम्य कोकणाचा आनंद घेत प्रवास करता येणार आहे. या महामार्गात रेवस-करंजा, रेवदंडा, बाणकोट, आगरदांडा, केळशी, कुणकेश्वर आणि जयगड खाडीवर एकूण सात मोठे पूल उभारण्यात येत आहेत.

रेवदंडा खाडीवरील पूल पूर्ण झाल्यानंतर अलिबाग, चौल, रेवदंडा, मुरूड आणि परिसरातील अनेक गावांमधील अंतर आणि प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. यामुळे पर्यटन, मत्स्यव्यवसाय, स्थानिक व्यापार तसेच औद्योगिक क्षेत्रालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

सध्या चौल व रेवदंडा परिसरात पुलाचे खांब उभारण्याचे काम सुरू असून, प्रकल्पाची गती वाढविण्यात आली आहे. २०२८ अखेरपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर कोकण किनारपट्टीतील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होऊन प्रदेशाच्या आर्थिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande