
लातूर, 04 जून (हिं.स.)।
लातूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरीब व सर्वसामान्य रुग्णांवर होत असलेल्या कथित गैरवर्तन, भ्रष्टाचार आणि अपमानास्पद वागणुकीविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सय्यद सलीम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिव्हिल हॉस्पिटल हे गरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या उपचारासाठी शासनाने उभारलेले सरकारी रुग्णालय असताना तेथे रुग्णांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात आहे. इमर्जन्सी विभागातील काही डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि सिक्युरिटी गार्ड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी उद्धट आणि अपमानास्पद भाषेत बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रुग्णांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असताना काही दलाल आणि वॉर्डबॉय पैसे घेऊन नंबर लावण्याचे प्रकार सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच सरकारी रुग्णालयात मोफत सुविधा उपलब्ध असताना एक्स-रे, मेडिकल टेस्ट आणि औषधांसाठी बाहेर पाठवून गरीब रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सिक्युरिटी गार्डकडून गरीब नागरिकांशी धक्काबुक्की, दमदाटी आणि शिवीगाळ केली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. महिला रुग्ण आणि डिलिव्हरी पेशंट यांच्यासोबतही गैरवर्तनाच्या घटना समोर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
“हे रुग्णालय कोणाच्या खासगी मालकीचे नसून जनतेच्या कराच्या पैशातून चालणारे सरकारी रुग्णालय आहे. गरीबांवर अन्याय करणाऱ्यांना जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा सय्यद सलीम यांनी दिला आहे.
गरीब आणि पीडित जनतेच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहणार असून येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
— सय्यद सलीम
जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, लातूर
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis