
परभणी, 04 जून (हिं.स.)।
जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत त्यांचे मासिक वेतन संबंधित मूळ शाळेतूनच नियमितपणे अदा करण्यात यावे, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिरिक्त कर्मचार्यांच्या समायोजनाची प्रक्रिया शिक्षण विभागाकडे अद्याप प्रलंबित आहे. विभागाकडून आदेश देण्यात आले असतानाही अनेक संस्था चालक विविध कारणे पुढे करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना समायोजित करून घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित कर्मचार्यांचा यामध्ये कोणताही दोष नसून सर्व कर्मचारी नवीन शाळेत रुजू होण्यास तयार आहेत. समायोजन ही पूर्णपणे प्रशासकीय प्रक्रिया असल्याने त्यास होणार्या विलंबासाठी कर्मचार्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे संघटनेने नमूद केले आहे.
समायोजन रखडल्यामुळे अनेक कर्मचार्यांचे वेतन थांबले असून त्यांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँक कर्जाचे हप्ते थकणे, मुलांच्या शिक्षणावर तसेच विवाहासारख्या कौटुंबिक जबाबदार्यांवर परिणाम होणे, सीबिल स्कोअर खराब होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचार्यांचे आर्थिक आणि मानसिक शोषण होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
संघटनेने पुढे म्हटले आहे की, हे कर्मचारी उन्हाळ्याच्या काळातही जणगणना, बीएलओ तसेच एसआयआरसारखी विविध शासकीय कामे प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 23 तसेच वेतन भुगतान अधिनियम 1936 नुसार केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळणे हा कर्मचार्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे समायोजन प्रक्रिया पूर्ण होऊन कर्मचारी नवीन शाळेत प्रत्यक्ष रुजू होईपर्यंत त्यांचे वेतन मूळ शाळेतूनच अदा करण्याबाबत तातडीने आदेश काढावेत, अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या निवेदनावर मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, जिल्हा सचिव निशांत हाके आणि जिल्हा उपाध्यक्ष अमित मोगल यांच्या स्वाक्षर्या आहेत.
दरम्यान, या मागणीबाबत सोमवारी पत्र काढण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis