
लातूर, 04 जून (हिं.स.)।
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर व हिंगोली जिल्हयात पोलीस पथकाची रवानगी केली होती.
सदर पथकाने, लातूर जिल्हयातील अहमदपुरात भाजी मार्केट परिसरातील भारत फ्रुट कंपनीच्या बाजूस असणाऱ्या मटका बुकीवर कारवाई करत, 17,890/- रुपयांची रोकड व 14 हजार रुपयांचे (02) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (3) आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द अहमदपुर पोलीस ठाणे येथे गुरनं 375/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, अहमदपुर मधील बसस्थानकाचे बाजूस असणाऱ्या शेडमध्ये, तितली भवरा नावाचा जुगार चालू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करत, 13,810/- रुपयांची रोकड व 18 हजार रुपयांचे (02) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (4) आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द अहमदपुर पोलीस ठाणे येथे गुरनं 376/2026 कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या दरम्यान, पोलीस पथकास हिंगोली जिल्हयातील पोलीस ठाणे औंढा नागनाथ हद्दीत अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने, पथकाने पोलीस ठाणे औंढा नागनाथ भागातील मौजे चिमेगांव शिवारातील पुर्णा नदीचे वाळू घाटावर कारवाई करत (3) हायवा, (2) JCB मशीन, एक ट्रॅक्टर यासह नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली (10) ब्रास वाळू, असा एकूण 01 कोटी 25 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात पोलीस ठाणे औंढा नागनाथ गुरनं 408/2026 कलम 303 (2), 62, 3(5) बी.एन.एस., कलम 48(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, कलम 4, 21 खाण व खनिज (नियमन व विकास) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाणे औंढा नागनाथ येथील पोउपनि अमोल इंगोले हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
उपरोक्त तिनही कारवायांत, पोलीस पथकाने 1,25,93,700/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीतांविरुद्ध वरीलप्रमाणे गुन्हे नोंद केले आहेत.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ व पोकॉ/ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
' खबर ' हेल्पलाइन वरून माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis