
सोलापूर, 04 जून (हिं.स.)। सोलापूर शहरातील ऐतिहासिक आदिला नाल्याचे मूळ अस्तित्व कायम ठेवून विकास आराखड्यातील त्रुटी दूर कराव्यात, या मागणीसाठी नगरसेवक गणेश दादा वानकर यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात आदिला नाला हा सोलापूर शहरातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक जलप्रवाह असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सर्व्हे ऑफ इंडिया नकाशे, महसूल अभिलेख आणि विविध शासकीय नोंदींमध्ये या नाल्याचा स्पष्ट उल्लेख असतानाही नव्या विकास आराखड्यात त्याला नदीचे स्वरूप देण्यात आल्याने मूळ अस्तित्वाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांच्या मालमत्ता व हक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. शिष्टमंडळाने UDCPR नियमांनुसार नाल्यालगत आवश्यक असलेल्या संरक्षित पट्ट्याचाही मुद्दा उपस्थित केला.
आदिला नाल्याचे मूळ स्वरूप कायम ठेवून विकास आराखड्यात आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी तसेच नागरिकांच्या मालमत्तांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी या विषयाची सविस्तर मांडणी करत नागरिकांच्या भावना पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड