मूर्तिजापूर मध्ये दूषित पाणीपुरवठा!
अकोला, 04 जून (हिं.स.)। एकीकडे शासनाकडून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात असताना, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील भीमनगर परिसरात मात्र नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सह
Photo


अकोला, 04 जून (हिं.स.)।

एकीकडे शासनाकडून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात असताना, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील भीमनगर परिसरात मात्र नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, येथील नागरिकांना चक्क डबक्यात साचलेले पाणी भरून आपली तहान भागवावी लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

मूर्तिजापूर शहराच्या बायपास रोडलगत असलेल्या भीमनगर परिसरात अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परिणामी महिलांसह लहान मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात साचलेल्या डबक्यातून नागरिक पाणी भरताना दिसत असून, यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

हे पाणी पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी वापरले जात असल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे पाण्याची गरज अधिक असताना भीमनगरवासीयांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असताना प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भीमनगर परिसरातील पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडवून नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डबक्यातील पाणी भरून तहान भागविण्याची वेळ नागरिकांवर येणे ही प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. भीमनगरवासीयांच्या पाणी समस्येवर तातडीने तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande