
रायगड, 04 जून (हिं.स.)। महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांमधील क्लबफूट (वाकडे पाय) या जन्मजात व्यंगाने ग्रस्त मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अदाणी फाउंडेशन आणि अनुष्का फाउंडेशन यांनी संयुक्तपणे तीन वर्षांचा महत्त्वाकांक्षी आरोग्य उपक्रम हाती घेतला आहे. जागतिक क्लबफूट दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाची घोषणा करण्यात आली असून, त्याअंतर्गत १० हजारांहून अधिक बालकांना दर्जेदार उपचार आणि आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमाचा लाभ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या पाच राज्यांतील ६१ जिल्ह्यांमधील बालकांना मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत ६७ क्लबफूट क्लिनिक अधिक सक्षम करण्यात येणार असून, आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण, लवकर निदान आणि जनजागृती मोहिमांवर भर दिला जाणार आहे.
क्लबफूट हा जन्मजात दोष वेळेत ओळखून योग्य उपचार केल्यास पूर्णपणे सुधारता येतो. त्यामुळे बालकांना योग्य वेळी उपचार मिळावेत, त्यांच्या हालचालींना मर्यादा येऊ नयेत तसेच शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांना समान संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी प्रत्येक मुलाला चालण्याची, शिकण्याची आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे, असे सांगत विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी काम करण्याच्या फाउंडेशनच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तर दीपक प्रेमनारायण यांनी या भागीदारीमुळे उपचारांची उपलब्धता वाढून लवकर निदानाची यंत्रणा अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सध्या अनुष्का फाउंडेशन देशातील १३ राज्यांतील १६५ जिल्ह्यांमध्ये क्लबफूट उपचार कार्यक्रम राबवत असून, २६ हजारांहून अधिक मुलांना उपचार मिळवून देण्यात मदत केली आहे. महाराष्ट्रातील बालआरोग्य क्षेत्रासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, क्लबफूटमुक्त भविष्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)