
नांदेड, 04 जून (हिं.स.)।
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी, उत्तरपुस्तिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अर्ज करता येणार आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, संबंधित परीक्षांची प्रोव्हिजनल गुणपत्रके (पीडीएफ) ८ जूनपूर्वी महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी ८ ते १८ जून या कालावधीत आपल्या महाविद्यालयामार्फत गुणपडताळणी, उत्तरपुस्तिकेची छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करू शकतील. निर्धारित मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून प्राप्त
अर्जाच्या शुल्काचा धनाकर्ष (डी.डी.) २० जूनपर्यंत काढून सर्व अर्ज २२ जूनपर्यंत विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या शुल्क संरचनेनुसार गुणपडताळणीसाठी प्रति पेपर ७५ रुपये, उत्तरपुस्तिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति पेपर ३५० रुपये, छायाप्रत
मिळाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी प्रति पेपर १५० रुपये, तर थेट पुनर्मूल्यांकनासाठी प्रति पेपर ३५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक आवेदनपत्रासाठी १० रुपये स्वतंत्र शुल्क आकारले जाईल. विद्यार्थ्यांनी मागविलेल्या उत्तरपुस्तिकांच्या
छायाप्रती संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या वेबमेलवर पाठविण्यात येणार असून महाविद्यालयामार्फत त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल 'ऑफिस व्हेरिफिकेशन' (OV) मुळे राखीव ठेवण्यात आले आहेत, त्या प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता महाविद्यालयांनी ८ जून २०२६ पर्यंत करावी, असेही विद्यापीठाने कळविले आहे.
दरम्यान, ज्या अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत, त्या अभ्यासक्रमांचे निकाल घोषित झाल्यानंतर साधारण सात दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, छायाप्रत व पुनर्मूल्यांकनासाठी ऑफलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis