
रत्नागिरी, 4 जून (हिं.स.) । रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या बैठका सुरू असल्याची माहिती समोर येत असून, लवकरच ते भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता आहे.
श्री. माने हे मंत्री नितेश राणे यांच्या विमानातून मुंबईहून रत्नागिरीत आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते पुन्हा नितेश राणे यांच्यासोबत त्याच विमानातून मुंबईला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना आणखी बळ मिळाले आहे.
श्री. माने यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांची उबाठा शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत श्री. माने यांच्या बैठका सुरू असून, आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या दृष्टीने तसेच मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात नवे राजकीय समीकरण उभे करण्यासाठी भाजप नेतृत्व आणि मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.
याचबरोबर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कोकणातील उरलेले संघटनात्मक बळ कमी करण्याची रणनीतीही या राजकीय हालचालीमागे असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, बाळ माने यांच्या उमेदवारी प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणारे माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. बाळ माने मुंबईत असताना श्री. जाधवदेखील गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. त्यामुळे या घडामोडींची पूर्वकल्पना त्यांना होती का, याबाबत विविध तर्कवितर्क आहेत.
तथापि, बाळ माने किंवा भाजपकडून त्यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. श्री. माने भाजपचे रत्नागिरीचे माजी आमदार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी