
रत्नागिरी, 4 जून, (हिं.स) - विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून भरलेला उमेदवारी अर्ज सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांनी आज (४ जून २०२६) मागे घेतला. माजी आमदार बाळ माने हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
अर्ज मागे घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माने म्हणाले, की महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, याची आधीच कल्पना होती; मात्र महायुतीत होत असलेल्या बंडखोरीमुळे मतविभाजनातून जिंकण्याची संधी आहे, असा कयास होता. म्हणूनच महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी देण्याचा निर्णय घटक पक्षांच्या बैठकीत झाला होता. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरताना मला सूचक म्हणून आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांकडून सह्या मिळाल्या नाहीत. फक्त शिवसेना उबाठाच्या नेत्यांकडूनच सह्या मिळाल्या. तसेच जुईली दळवी यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजनाची शक्यता कमी झाली. या पार्श्वभूमीवर अखेर आज माझा अर्ज मागे घेतला.
बाळ माने अर्ज माघारी घेण्यासाठी आलेले असताना भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे बाळ माने पुन्हा भाजपमध्ये जाणार आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला; मात्र त्याबद्दल त्यांनी काही भाष्य केले नाही.
दरम्यान, ही कृती पक्षविरोधी कारवाई ठरवून शिवसेना उबाठाने बाळ माने यांना तातडीने पक्षातून काढले आहे. संजय राऊत यांनी त्याबद्दल ट्विट करून माहिती दिली.
शेतकरी कामगार पक्षाकडून भरलेला उमेदवारी अर्ज अरविंद म्हात्रे यांनी आज मागे घेतला. मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनी अपक्ष म्हणून सादर केलेले अर्जही आज मागे घेतले. जुईली दळवी यांनी आधीच आपला अर्ज मागे घेतला होता. या मतदारसंघातून सहा उमेदवारांनी सादर केलेले सर्व १२ उमेदवारी अर्ज छाननीअंती वैध ठरले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, त्यामुळे महायुतीकडून उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी