
रायगड, 04 जून (हिं.स.): राज्यातील प्रवासी वाहतूक क्षेत्रातील चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी कार्यरत असलेल्या कल्याणकारी मंडळाच्या नावात तसेच सभासदत्वाच्या पात्रतेमध्ये शासनाने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. शासनाच्या गृह विभागाच्या २० मे २०२६ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार आणि परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार ही सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी दिली.
यापूर्वी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंडळाचे नाव बदलून आता धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ असे करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे मंडळाच्या कार्यक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी या मंडळाचे सभासदत्व केवळ ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांपुरते मर्यादित होते. मात्र, अधिकाधिक चालकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सुविधांचा लाभ मिळावा या उद्देशाने आता पात्रतेच्या अटींमध्ये बदल करण्यात आला आहे.
नवीन नियमांनुसार, ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांबरोबरच सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे, वैध वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि अधिकृत बॅजधारक चालक मंडळाचे सभासद होण्यासाठी पात्र ठरणार आहेत. यामुळे राज्यातील हजारो प्रवासी वाहन चालकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी सर्व पात्र चालकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जास्तीत जास्त चालकांनी सभासद नोंदणी करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे राज्यातील प्रवासी वाहतूक क्षेत्रातील चालकांच्या सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)