
रत्नागिरी, 4 जून (हिं.स.) । रत्नागिरी विभागीय डाकघर अधीक्षक कार्यालयातर्फे येत्या १५ जून रोजी सकाळी 11 वाजता विभागीय स्तरावरील डाक अदालत गोगटे जोगळेकर कॉलेजशेजारच्या कार्यालयात आयोजित केली आहे.
पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डरबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्या नावे दिनांक 10 जून 2026 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी