
लातूर, 04 जून (हिं.स.)। खाद्यतेलाची पॅकिंगविना विक्री तसेच भेसळ आणि धने, लाल मिरची व पोंगाच्या दर्जा निकृष्ट असल्याचा संशय आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी दिवसभरात पाच ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या कारवाईत १ हजार ७९६ किलोग्रॅम खाद्यतेल तर ४३० किलोग्रॅम अन्य साहित्य जप्त करण्यात आले. त्याची किंमत ३ लाख ४३ हजार ५९६ रुपये आहे. या कारवाईमुळे निकृष्ट दर्जाचे साहित्य, भेसळ करणाऱ्यांच्या धाबे दणाणले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर भेसळीचा संशय आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ विक्रेते आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे छत्रपती संभाजीनगरचे सहआयुक्त एस. आर. करकाळे, लातूरचे सहाय्यक आयुक्त पी.एस. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. लोंढे, पी.जी. खाडे, संदी बोचरे, पूजा शिंदे, विभावरी इंगळे आणि नमुना सहाय्यक शुभम हंगे यांनी लातूर, उदगीरात ही कारवाई केली आहे.
लेबल विना खाद्यतेल विक्री..
* लातुरातील गंजगोलाई परिसरातील एका दुकानातून कुठल्याही लेबलविना आणि सुट्टे रिफाइंड सोयाबीन खाद्यतेल विक्री सुरु होते. तिथे छापा टाकून ७२० किलो तेल जप्त केले. त्याची किंमत १ लाख १५ हजार २०० रुपये आहे.
* उदगीरातील एका ऑईल मिलवर धाड टाकून सुट्या स्वरुपात विक्री होणारे ५३८ किलोग्रॅम रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत ८४ हजार ४६६ रुपये आहे.
* उदगीर तालुक्यातील हाकनाकवाडी पाटी येथील एका ऑईल इंडस्ट्रीवर धाड टाकण्यात आली. भेसळीची शंका आल्याने ५३८ किलोग्रॅम रिफाईंड सूर्यफुल तेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत १ लाख ३ हजार ६६० रुपये आहे.
लातुरातील एमआयडीसीतील एका कारखान्यावर छापा टाकून २२२ किलोग्रॅम अख्खे धणे व लाल मिरची पावडर जप्त करण्यात आली. त्याची किंमत ३० हजार ९१० रुपये आहे. तसेच शहरातील एमआयडीसीतील एका प्रॉडक्ट ठिकाणची अचानक तपासणी करुन २०८ किलोग्रॅम पोंगा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ९ हजार ३६० रुपये आहे. रंगाच्या बाबतीत निकष्ट दर्जाचा संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. भेसळीचा संशय, निकृष्ट दर्जाचा संशय आल्याने कारवाई करण्यात येत आहे. कोणालाही संशय आल्यास तात्काळ तक्रार करावी.
- पी.एस. काकडे, सहाय्यकआयुक्त (अन्न). यांनी केले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis