बीड - ओंकार शुगर्सच्या दारात शेतकऱ्यांचा एल्गार; मुख्य प्रवेशद्वार रोखले
बीड, 04 जून (हिं.स.)। परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार शुगर युनिट क्रमांक ८ या साखर कारखान्याने मार्च अखेरीस गाळप केलेल्या ऊसाचे थकीत बिल घोषित दरानुसार तत्काळ अदा करावे, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या कारखान्याच्य
बीड - ओंकार शुगर्सच्या दारात शेतकऱ्यांचा एल्गार; मुख्य प्रवेशद्वार रोखले


बीड, 04 जून (हिं.स.)। परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार शुगर युनिट क्रमांक ८ या साखर कारखान्याने मार्च अखेरीस गाळप केलेल्या ऊसाचे थकीत बिल घोषित दरानुसार तत्काळ अदा करावे, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. कारखानदाराच्या आडमुठ्या आणि असंवेदनशील भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार रोखून धरले. बीड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली आणि तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रशासनाशी चर्चा केली, मात्र प्रशासनाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी या वैद्यनाथ साखर कारखान्याची पायाभरणी केली होती, त्याच कारखान्याच्या दारात त्यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांवर हक्काच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरण्याची नामुष्की ओढवली .

कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांची केलेली आर्थिक फसवणूक आणि चालढकल या आंदोलनामागे मुख्य कारण आहे. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वी ८ मे रोजी बेमुदत आंदोलन केले होते, तेव्हा कारखाना प्रशासनाने २५ मे पर्यंत घोषित केलेल्या २९५० रुपये प्रति टन दराप्रमाणे सर्व बिल अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ १८०० रुपयांप्रमाणे रक्कम खात्यावर वर्ग करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. एकाच गळीत हंगामात सुरुवातीला एक दर आणि नंतर दुसराच दर देऊन शेतकऱ्यांची उघड थकावणी केली जात आहे. मे महिना संपूनही उर्वरित हक्काचे पैसे न मिळाल्याने अखेर वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा बेमुदत सत्याग्रह सुरू केला.

या संघर्षात संपूर्ण परिसरातील शेतकरी एकवटले असून पांगरी, लिंबोटा, कौडगाव आणि परिसरातील हजारो ऊस उत्पादक कारखान्याच्या दारात ठाण मांडून बसले आहेत. संघर्ष समितीचे ॲड. अजय बुरांडे, ॲड. श्रीनिवास मुंडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, प्रभाकर पौळ, लक्ष्मण पौळ, कॉ. भगवान बडे, रघुनाथ दादा देशमुख, बिभीषण गिते, बाळासाहेब मुंडे, हनुमंत लोंढे, कृष्णा कराड, दत्तात्रय तिडके, ॲड. प्रकाश मुंडे आणि सूर्यकांत तिडके यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत जोपर्यंत घामाचा दाम मिळत नाही, तोपर्यंत कारखान्याचे प्रवेशद्वार मोकळे करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande