
रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी दिली ८ जूनची डेडलाइन
नाशिक, 04 जून (हिं.स.)। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुढील आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यासाठी आज पाथर्डी येथील कृष्ण संगिनी हॉटेलमध्ये छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण पंढरीनाथ गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोजताई अहिरे, भाजपचे नगरसेवक भगवान दोंदे, सामाजिक कार्यकर्ते मदन ढेमसे, दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, त्र्यंबक कोंबडे, सोमनाथ बोराडे, सुभाष गायकर, उत्तम जाधव, पुंडलिक जाधव यांच्यासह रिंग रोड बाधित २५ गावांतील प्रमुख शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून रिंग रोड बाधित शेतकरी न्यायासाठी संघर्ष करत असून विविध आंदोलने, निवेदने, बैठका आणि चर्चांच्या माध्यमातून शासनाकडे आपल्या मागण्या सातत्याने मांडत आहेत. या लढ्यामध्ये आमदार हिरामण खोसकर व आमदार देवयानी फरांदे यांच्यानंतर आमदार सरोजताई अहिरे यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत रिंग रोड बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरच्या संघर्षात सहभागी होण्याची भूमिका जाहीर केली.
यावेळी बोलताना आमदार सरोजताई अहिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची भूमिका थेट मांडण्यासाठी वेळ मागितल्याचे सांगितले. तसेच बैठकीदरम्यान त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून लवकरात लवकर शेतकऱ्यांची निर्णायक बैठक आयोजित करावी आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्यात आपण खंबीरपणे त्यांच्या सोबत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत गावनिहाय आढावा घेण्यात आला. विविध गावांमध्ये दाखल झालेल्या तक्रारी, कलम १९ व २१ अंतर्गत आलेल्या नोटिसा, त्या नोटिसींना देण्यात आलेली उत्तरे, तसेच नवीन अलाइनमेंट संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी संबंधित अधिकारी करत आहेत की नाही, याची सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, येत्या ८ जून रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील चारही मंत्री, नामदार छगन भुजबळ, नामदार नरहरी झिरवाळ, नामदार दादा भुसे, सर्व खासदार-आमदार, संबंधित अधिकारी आणि रिंग रोड बाधित शेतकरी यांची अंतिम आणि निर्णायक बैठक आयोजित करावी. या बैठकीत शेतकरी हिताचा ठोस तोडगा काढून अंतिम निर्णय घेण्यात यावा.
जोपर्यंत शासन स्तरावरील निर्णायक बैठक होत नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत एकही शेतकरी आंदोलनस्थळ सोडून घरी परतणार नाही, असा इशारा बैठकीत देण्यात आला.बैठकीस २५ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने अंतिम लढाईसाठी सज्ज असल्याचे जाहीर केले असून शासनाने आता विलंब न करता शेतकरी हिताचा मार्ग काढावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
यावेळी शेतकरी प्रतिनिधींमध्ये सुदाम जाचक, सागर लोणे, तुषार कोंबडे, गोकुळ बोराडे, धनाजी जाधव, उत्तम जाधव, तानाजी जाधव, भास्कर चुंबळे, दौलत चुंबळे, संजय हंडोरे, मनीष हांडोरे, मधुकर पोरजे, अविनाश पोरजे, शांताराम पिंगळे, विनोद कातड, शिवाजी हगवणे, दशरथ हगवणे, गोकुळ लांबे, रवी पेखळे, पंकज खताळे, संदीप बर्वे, हिरामण गोडसे, सचिन गोडसे, लालजी हंडोरे आदींसह २५ गावांतील शेकडो शेतकरी बैठकीला उपस्थित होते.
चौकट
संयम संपत चालला
अनेक बैठका, चर्चा आणि पाठपुराव्यानंतरही प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे. त्यामुळे शासनाने वेळकाढूपणा न करता तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा भविष्यात होणाऱ्या तीव्र आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी जिल्ह्यातील मंत्री, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवर राहील, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV