
पुणे, 04 जून (हिं.स.)।
मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली एलपीजी सिलिंडरची टंचाई आणि शासनाने पीएनजी वापरासाठी केलेले प्रोत्साहन यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पाइप नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने तब्बल 25 हजार नव्या पीएनजी जोडण्या देत विक्रमी नोंद केली आहे.एमएनजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात पुणे आणि परिसरात सुमारे 11 हजार पीएनजी जोडण्या देण्यात आल्या होत्या. मात्र, 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत कंपनीने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत तब्बल 25 हजार नवीन जोडण्या दिल्या आहेत.पीएनजीच्या वाढत्या मागणीमागे एलपीजी पुरवठ्याविषयी निर्माण झालेली अनिश्चितता तसेच घरगुती गॅस वापरासाठी पीएनजीला प्राधान्य देण्याच्या सरकारी धोरणाचा प्रभाव असल्याचे मानले जात आहे. ज्या भागांमध्ये पीएनजी पाइपलाइनची सुविधा उपलब्ध आहे, तेथील नागरिकांनी पुढील काही महिन्यांत एलपीजीऐवजी पीएनजीचा वापर स्वीकारावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.जागतिक स्तरावर द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) वाहतुकीवर विविध कारणांमुळे दबाव निर्माण झाला असला, तरी केंद्र सरकारच्या धोरणानुसार घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी आवश्यक गॅसपुरवठा शंभर टक्के सुरक्षित आणि आरक्षित ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सुरक्षित, अखंड आणि घरपोच उपलब्ध होणाऱ्या गॅसपुरवठ्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा पीएनजीकडे कल वाढत असून आगामी काळातही या जोडण्यांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु