पंढरपूरमध्ये विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
सोलापूर, 04 जून (हिं.स.)। पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे शिवारात मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विघ्नेश सज्जन शेज
sdfg


सोलापूर, 04 जून (हिं.स.)। पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे शिवारात मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विघ्नेश सज्जन शेजाळ (वय १३) आणि अनंत महादेव नलवडे (वय १४, रा. गुरसाळे) अशी मृत मुलांची नावे आहेत. हे दोघे जिवलग मित्र मंगळवारी सकाळी बाळुमामांच्या मेंढरांची सेवा करण्यासाठी शिवारात गेले होते. दुपारच्या कडक उन्हामुळे ते जवळील विहिरीकडे गेल्याचे सांगण्यात येते. स्थानिकांच्या माहितीनुसार, दोघे पोहण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी विहिरीत उतरले असावेत. त्यापैकी एकाला पोहता येत होते, तर दुसऱ्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बराच वेळ दोघेही दिसून न आल्याने आणि विहिरीजवळ त्यांचे कपडे व चपला आढळल्याने एका मेंढपाळाला संशय आला. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे गुरसाळे गावात शोककळा पसरली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात दोन चिमुकल्यांचा झालेला मृत्यू गावकऱ्यांच्या मनाला चटका लावून गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande