
परभणी, 04 जून (हिं.स.)।
राज्य शासनाने कर्जमाफी संदर्भात जाहीर केलेल्या अध्यादेशात विविध अटी-शर्ती लादून शेतकर्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत सोनपेठ येथील शेतकर्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. यावेळी शासनाच्या अध्यादेशाची जाहीर होळी करण्यात आली, तसेच गाढवाला शाल, टोपी, हार व श्रीफळ अर्पण करून निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या अध्यादेशात नेहमीप्रमाणे अनेक अटी व निकष घालण्यात आल्याने लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या योजनेचा लाभ केवळ मोजक्याच शेतकर्यांना मिळणार असल्याने तरुण शेतकर्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी एकत्र येत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या अध्यादेशाची होळी केली. तसेच फसवी कर्जमाफी जाहीर केल्याच्या निषेधार्थ गाढवाला शाल, टोपी, हार व श्रीफळ अर्पण करून अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात भारत राष्ट्र किसान समितीचे सुधीर बिंदू, शेतकरी संघटनेचे नेते गणेश पाटील, विश्वंभर गोरवे, ऋषिकेश जोगदंड, काँग्रेसचे सैफुल्ला सौदागर, राजेश जोगदंड, किरण सोळंके, मंगेश जोगदंड, राहुल रोडे, नारायण फफाळ, चंद्रकांत नाईकनवरे, माधव जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.आंदोलनकर्त्यांनी शासनाने कर्जमाफीचा पुनर्विचार करून सर्व पात्र शेतकर्यांना न्याय मिळेल अशी व्यापक योजना लागू करावी, अशी मागणी यावेळी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis