
पुणे, 04 जून (हिं.स.)।पुणे रेल्वेस्थानकावर गाड्यांची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या होल्डिंग एरियामध्ये आता आधुनिक सुविधांची भर पडणार आहे. अंबेला गेटखालील या प्रतीक्षा क्षेत्रात मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, स्नॅक्स काउंटर आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर डिस्पेन्सरीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्यामुळे अनेक प्रवाशांना तासनतास स्थानकावर थांबावे लागते. विशेषतः वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने यापूर्वी अंबेला गेटखाली होल्डिंग एरिया विकसित केला होता.आता या होल्डिंग एरियाला अधिक प्रवासी-अनुकूल बनविण्याच्या उद्देशाने विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, अल्पोपहारासाठी स्नॅक्स काउंटर तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापैकी काही सुविधा मोफत तर काही सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या मते, या सुविधांमुळे प्रवाशांचा प्रतीक्षेचा वेळ अधिक आरामदायी आणि सुखकर होईल. रेल्वेची वाट पाहताना कंटाळा येण्याऐवजी प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि घरगुती वातावरणाचा अनुभव मिळेल.या उपक्रमामुळे पुणे रेल्वेस्थानकावरील प्रवासी सुविधांमध्ये आणखी सुधारणा होणार असून दररोज हजारो प्रवाशांना त्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु