
परभणी, 04 जून (हिं.स.)।
पर्यावरण संरक्षणासाठी तसेच शारीरिक तंदुरुस्तीसाठी नागरिकांनी नियमित सायकलचा वापर करावा, असे आवाहन डॉ. केदार खटींग यांनी केले.
पर्यावरण संवर्धनासोबतच निरोगी आरोग्यासाठी सायकल चालविण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणी शहरात केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत तसेच परभणी सायकल ग्रुपच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, परभणी सायकल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. केदार खटिंग, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, पोलीस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून रॅलीला प्रारंभ झाला. शिवाजी चौक, महात्मा फुले पुतळा, वसमत रोड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसर मार्गे ही रॅली राजगोपालाचारी उद्यान येथे पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना परभणी सायकल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. केदार खटिंग यांनी सायकल चालविण्याचे आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक फायदे अधोरेखित केले. पर्यावरण संरक्षणासाठी तसेच शारीरिक तंदुरुस्तीसाठी नागरिकांनी नियमित सायकलचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. वाढते प्रदूषण आणि पेट्रोल-डिझेलवरील वाढता ताण लक्षात घेता दैनंदिन कामांसाठी शक्य तितका सायकलचा वापर करावा आणि वाहनांचा वापर कमी करून पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सायकल वापराच्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis