
सोलापूर, 04 जून (हिं.स.)।
तेलबिया पिकांच्या काढणीनंतर होणारे नुकसान कमी करण्यासाठी तसेच स्थानिक स्तरावर मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात गोदाम बांधकाम आणि तेल काढणी प्रक्रिया युनिट्ससाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी 30 जूनपर्यंत ऑफलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी 250 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. सरकारी व खाजगी उद्योग, समूह आधारित व्यवसाय संस्था (CBBOs), शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी (FPOs) तसेच सहकारी संस्था या योजनेसाठी पात्र राहतील.सदर योजना बँक कर्जाशी संलग्न असून केंद्र शासनाच्या SMART व केंद्रीय वखार महामंडळाच्या (CWC) मार्गदर्शक सूचनांनुसार अधिकृत वित्तीय संस्थेकडून कर्ज मंजुरी घेणे आवश्यक आहे.मार्गदर्शक सूचनांनुसार 250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी अंदाजित खर्च 28.80 लाख रुपये निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 14.40 लाख रुपये (यापैकी जे कमी असेल ते) अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे.लाभार्थींची निवड ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्त्वावर केली जाईल. अर्जांची संख्या उपलब्ध उद्दिष्टांपेक्षा जास्त असल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.गोदामाचे डिझाइन आणि तांत्रिक निकष सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) किंवा केंद्रीय वखार महामंडळाच्या मान्यताप्राप्त निकषांनुसार असणे बंधनकारक आहे.इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 30 जूनपूर्वी संबंधित कृषी विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड