
लातूर, 4 जून, (हिं.स.) : अनियमित पावसाचा काही प्रमाणात सोयाबीन बियाण्यांवर परिणाम झाल्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून व पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणीस सुरुवात करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले. मौजे मळवटी (ता. लातूर) येथे गुरुवारी खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
दिलीप जाधव यांनी सांगितले की, खरीप हंगाम हा उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून हंगामपूर्व नियोजन हे उत्पादनवाढीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती मशागत, बीजोत्पादन, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया याकडे विशेष लक्ष द्यावे. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी केल्यास पुढील अनेक अडचणी टाळता येतील.
यावेळी शेतकरी व विविध कंपन्यांनी तयार केलेल्या बियाणे प्लॉटची पाहणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तसेच यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी बीबीएफ (Broad Bed Furrow) अथवा टोकण पद्धतीने पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला.
बियाणे उगवले नाही अशा तक्रारी करण्यापेक्षा पेरणीपूर्व आवश्यक खबरदारी घेतल्यास दुबार पेरणीसह इतर अनेक समस्या टाळता येतील आणि शेतकऱ्यांचा खर्च वाचेल, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीस तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड, मंडळ कृषी अधिकारी आर. आर. येवले, कृषी अधिकारी व्ही. एम. झांबरे, सचिन हिंदोळे, सरपंच गोविंद गरड, गणपती शिंदे, सरोजा गरड, सुनीताबाई बैले तसेच महिला शेतकरी गटातील सदस्य व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis