गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आधार; वाशीत शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध
रायगड, 04 जून (हिं.स.) राज्यातील इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यासाठी मुलांचे शासकीय वसतिगृह वाशी, नवी मुंबई येथे सुरू
obc


रायगड, 04 जून (हिं.स.) राज्यातील इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यासाठी मुलांचे शासकीय वसतिगृह वाशी, नवी मुंबई येथे सुरू करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निवासी सुविधा मिळणार आहे.

वाशी येथील सेक्टर १९-व्ही, प्लॉट क्रमांक ७, व्ही बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर हे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश देण्यात येणार आहे.

याशिवाय, पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रथम वर्षाच्या प्रवेशानंतर जागा रिक्त राहिल्यास पात्र विद्यार्थ्यांना तृतीय व चतुर्थ वर्षातही प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षातील प्रवेशासाठी बारावी परीक्षेतील गुणांचा विचार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वसतिगृहातील प्रवेशासाठी विविध प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये इतर मागास वर्गासाठी ५१ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ३३ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी ६ टक्के, दिव्यांगांसाठी ४ टक्के, अनाथ विद्यार्थ्यांसाठी २ टक्के तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) विद्यार्थ्यांसाठी ४ टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.

या योजनेमुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. शासन निर्णयातील अटी-शर्ती व अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande