
सोलापूर, 04 जून (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माढ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईबद्दल मुंढे यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवित त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते शंभूराजे साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत दुग्धाभिषेक केला. प्रशासनातील प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनहिताची भूमिका यांचे प्रतीक म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भेसळखोरांविरोधात कोणतीही तडजोड न करता सुरू असलेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मुंढे यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला असून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले. यावेळी आंदोलकांनी साखर उद्योगातील विविध प्रलंबित प्रश्नांकडेही लक्ष वेधले.
अनेक साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची उसबिले थकीत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि कठोर प्रशासकीय अधिकाऱ्याची साखर आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास थकीत उसबिलांच्या वसुलीला गती मिळेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड