
सोलापूर, 04 जून (हिं.स.)। पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत चुरशीचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे उमेदवार राजेंद्र राउत यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असले तरी अनेक नगरसेवकांमध्ये निवडणूक प्रत्यक्ष लढविली जावी, अशी भावना असल्याचे स्पष्ट झाले.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडी व त्यातून निर्माण झालेल्या नाराजीचा हिशोब चुकता करण्याची संधी या निवडणुकीत मिळावी, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज हा अंतिम दिवस आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र राउत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
याशिवाय शिंदेसेनेचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, महेश साठे, उद्धवसेनेचे धनंजय डिकोळे, बार्शीतील उद्धवसेनेचे गटनेते नागेश अक्कलकोटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असून, निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची लढत रंगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड