जुलैअखेरपर्यंतच पुरेल पाणी; पुणे महापालिकेचा दिवसाआड पुरवठ्याचा विचार
पुणे, 04 जून (हिं.स.)। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पामध्ये अवघा साडेपाच टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुणेकरांना पुढील आठवड्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिक
water


पुणे, 04 जून (हिं.स.)। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पामध्ये अवघा साडेपाच टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुणेकरांना पुढील आठवड्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांकडे सादर केला आहे.

सध्याच्या पाणीवाटपात कोणतीही कपात न केल्यास धरणातील उपलब्ध पाणीसाठा जुलैअखेरपर्यंतच पुरेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी, म्हणजेच 90 टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची शक्यता वर्तविली असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जून महिना सुरू झाला असला तरी शहरात अद्याप पूर्वमोसमी पावसाची समाधानकारक सुरुवात झालेली नाही. तसेच मान्सूनचे आगमनही सुमारे दोन आठवडे उशिरा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीत पाणी कपातीच्या विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. शहरासाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याने सर्वपक्षीय प्रतिनिधींशी चर्चा करून पुढील आठवड्यापासून पाणी कपातीची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू आहे.महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी संभाव्य वेळापत्रकही तयार केले असून अंतिम निर्णयानंतर त्याची घोषणा करण्यात येणार आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की, आतापासूनच पाणी बचतीचे उपाय राबविल्यास उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करून पुढील काळातील संभाव्य पाणीटंचाई टाळता येऊ शकते.दरम्यान, संभाव्य पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणी बचतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande