इराणकडे १० अणुबॉम्बसाठी पुरेसा युरेनियम साठा? आयएईएच्या अहवालाने वाढवली चिंता
वियना, 05 जून (हिं.स.)।संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षण संस्था आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए ) ने इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सदस्य देशांमध्ये प्रसारित करण्यात आलेल्या एका गोपनीय अहवालात संस्थेने म्हटले आहे की,
इराणकडे १० अणुबॉम्बसाठी पुरेसा युरेनियम साठा? आयएईएच्या अहवालाने वाढवली चिंता


वियना, 05 जून (हिं.स.)।संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षण संस्था आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए ) ने इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सदस्य देशांमध्ये प्रसारित करण्यात आलेल्या एका गोपनीय अहवालात संस्थेने म्हटले आहे की, गेल्या जूनमध्ये झालेल्या युद्धामुळे प्रभावित झालेल्या इराणी अणु केंद्रांची तपासणी करण्यात तिला अद्याप यश आलेले नाही.

आयएईए च्या मते, सध्या इराणकडे असलेल्या संवर्धित युरेनियमचा साठा किती आहे, त्याची रचना काय आहे आणि तो नेमका कुठे ठेवण्यात आला आहे, याबाबत माहिती देण्याच्या स्थितीत संस्था नाही. तसेच, इराणने युरेनियम संवर्धनाशी संबंधित सर्व उपक्रम पूर्णपणे थांबवले आहेत की नाहीत, याचीही पुष्टी आयएईए करू शकत नाही. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, अण्वस्त्र प्रसारबंदी करार (NPT) अंतर्गत सुरक्षा निरीक्षणाशी संबंधित आपली जबाबदारी पार पाडण्यात संस्था सध्या सक्षम नाही. आयएईएने ठामपणे सांगितले की, इराणने करारांतर्गत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या तातडीने आणि पूर्णपणे अंमलात आणणे अत्यावश्यक आहे.

फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मागील अहवालानंतर आयएईएच्या निरीक्षकांनी इराणमधील केवळ बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट दिली आहे. ही तपासणी १ ते ३ जूनदरम्यान करण्यात आली. बुशेहरमधील कार्यरत अणुभट्टीमध्ये रशियाकडून मिळालेल्या ४.५ टक्के संवर्धित युरेनियमचा वापर केला जातो. वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कमी पातळीच्या संवर्धनातील हे युरेनियम मानले जाते. हा अहवाल अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा पश्चिम आशियातील तणाव सातत्याने वाढत आहे. बुधवारी इराणी ड्रोन हल्ल्यांमध्ये कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर काही काळ विमानतळावरील कामकाज स्थगित करण्यात आले होते. हा हल्ला इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवायांच्या मालिकेचा भाग मानला जात आहे. त्यामुळे आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या युद्धविरामाबाबत नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आयएईएच्या माहितीनुसार, इराणकडे सध्या ६० टक्क्यांपर्यंत संवर्धित केलेल्या युरेनियम ४४०.९ किलोग्रॅम साठा आहे. तज्ज्ञांच्या मते, हे प्रमाण अण्वस्त्रांसाठी आवश्यक असलेल्या ९० टक्के संवर्धनाच्या पातळीपासून तांत्रिकदृष्ट्या फार दूर नाही.

आयएईए चे महासंचालक राफाएल ग्रोसी यांनी अलीकडील एका मुलाखतीत इशारा दिला होता की, इराणने आपल्या अणु कार्यक्रमाचे रूपांतर अण्वस्त्रनिर्मितीत करण्याचा निर्णय घेतल्यास हा साठा सैद्धांतिकदृष्ट्या सुमारे १० अणुबॉम्ब तयार करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की याचा अर्थ इराणकडे सध्या अण्वस्त्रे आहेत, असा होत नाही.

संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इतक्या उच्च पातळीवर संवर्धित केलेल्या अणु पदार्थाची साधारणपणे दर महिन्याला पडताळणी करणे आवश्यक असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आयएईए ला हे शक्य होत नाही. अहवालात राफाएल ग्रोसी यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक चर्चांना पाठिंबा असल्याचे पुन्हा नमूद केले आहे. कोणताही संभाव्य करार अंमलात आणण्यासाठी आयएईए पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande