भारत-अमेरिका व्यापार करार निश्चित, ट्रम्प यांचा मोठा दावा
वॉशिंग्टन , 05 जून (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार निश्चितपणे होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला चांगला मित्र संबोधत त्यांनी दोन्ही देशांतील संबंध
भारत-अमेरिका व्यापार करार निश्चित, ट्रम्प यांचा मोठा दावा


वॉशिंग्टन , 05 जून (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार निश्चितपणे होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला चांगला मित्र संबोधत त्यांनी दोन्ही देशांतील संबंध मजबूत असून व्यापार चर्चा योग्य दिशेने पुढे जात असल्याचे सांगितले.

व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी दावा केला की, अनेक वर्षे भारताने अमेरिकन वस्तूंवर उच्च आयात शुल्क आकारले. भारत अमेरिकन उत्पादनांवर मोठे टॅरिफ लावत होता, तर अमेरिकेला त्याचा समान लाभ मिळत नव्हता, असे ते म्हणाले. मात्र, आता परिस्थिती बदलली असून भारतासोबतच्या व्यापारातून अमेरिकेला चांगले उत्पन्न मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “आम्ही करारापर्यंत पोहोचू, कारण मला पंतप्रधान मोदी खूप आवडतात. ते माझे चांगले मित्र आहेत आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत.”

दरम्यान, दोन्ही देशांदरम्यान अंतरिम द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील चर्चा सुरू आहे. याच अनुषंगाने अमेरिकेचे एक शिष्टमंडळ या आठवड्यात भारत दौऱ्यावर आले होते. चार दिवस चाललेल्या या चर्चेची सांगता गुरुवारी झाली.भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही बाजूंमधील चर्चा सहकार्यपूर्ण आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून पार पडली. भारत आणि अमेरिकेने असा करार करण्यासाठी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे, ज्यामुळे व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक बळकट होतील तसेच दोन्ही देशांना समान लाभ मिळेल.

अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व मुख्य वाटाघाटी प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांनी केले, तर भारतीय बाजूचे नेतृत्व वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव दर्पण जैन यांनी केले. दोन्ही देशांनी पहिल्या टप्प्यातील द्विपक्षीय व्यापार कराराची रूपरेषा निश्चित केली आहे. आता अंतरिम कराराच्या तपशीलांना अंतिम स्वरूप देण्याबरोबरच व्यापक व्यापार करारावर पुढील चर्चा सुरू आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी अलीकडेच सांगितले होते की, पहिल्या टप्प्यातील बहुतेक मुद्यांवर सहमती झाली असून आता केवळ काही किरकोळ मुद्द्यांवर चर्चा बाकी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande