
इस्लामाबाद , 05 जून (हिं.स.)।भारतासोबतचा लष्करी संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वेळेवर हस्तक्षेपाबद्दल पाकिस्तान कायम कृतज्ञ राहील, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. ते अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी (४ जून २०२६) अमेरिकन दूतावासाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात बोलताना बोलत होते. यावेळी शहबाज शरीफ यांनी पाकिस्तान-अमेरिका संबंधांना जवळपास आठ दशकांपासून टिकून असलेले एक खरे आणि विशेष नाते असे संबोधले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवस चाललेल्या लष्करी संघर्षाचा उल्लेख करताना शहबाज शरीफ यांनी सांगितले की, हा संघर्ष संपवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाने महत्त्वाची भूमिका बजावली. शहबाज शरीफ म्हणाले, “गेल्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे संघर्षाला सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी योग्य वेळी आणि निर्णायक हस्तक्षेप केला, ज्यामुळे १० मे २०२५ रोजी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला.”
ते पुढे म्हणाले, “दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि लाखो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सदैव आभारी राहू. या संदर्भात त्यांची कायम शांततेसाठी प्रयत्न करणारे नेते म्हणून आठवण ठेवली जाईल.”पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत संरचना लक्ष्य करण्यात आल्या होत्या.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा दावा केला आहे की, संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यात त्यांनी मदत केली. मात्र, भारताने सातत्याने स्पष्ट केले आहे की संघर्षविरामाचा निर्णय दोन्ही देशांमध्ये थेट चर्चेद्वारे झाला होता आणि कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीचा दावा भारताने फेटाळून लावला आहे.
शहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वशैलीचेही कौतुक केले. ते म्हणाले की, अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये आणि राष्ट्रीय हितसंबंधांच्या संरक्षणासाठी ट्रम्प यांनी नवचैतन्य, ऊर्जा आणि दृढनिश्चय निर्माण केला आहे. त्यांच्या धाडसी आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली अमेरिका शांतता, प्रगती आणि समृद्धीला चालना देत असून जगभरात विश्वास आणि गतिमानता निर्माण करत आहे.
द्विपक्षीय संबंधांचा इतिहास सांगताना शहबाज शरीफ यांनी नमूद केले की, १९४७ मध्ये पाकिस्तानची स्थापना झाल्यानंतर त्याला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश होता. त्यांनी सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, कृषी, विज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रांतील सहकार्यावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आमचे संबंध खरे आणि विशेष आहेत. जवळपास आठ दशकांच्या या नात्यात केवळ सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्यच नाही, तर व्यापार, गुंतवणूक, कृषी, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आणि लोकांमधील परस्पर संवाद अशा अनेक क्षेत्रांतील सहकार्याचाही समावेश आहे.”
प्रादेशिक राजनयाविषयी बोलताना शहबाज शरीफ यांनी दावा केला की, अमेरिका आणि इराण यांच्यात संवाद प्रस्थापित करण्यामध्ये पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तसेच शांततेच्या प्रयत्नांमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode