रायगडमध्ये १०.८९ लाख पाठ्यपुस्तकांचे वितरण; शिक्षण विभाग सज्ज
रायगड, 08 जून (हिं.स.) : आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मोफत पाठ्यपुस्तक वितरणाची तयारी पूर्ण केली आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या २ लाख २५६ विद्यार्थ्यांना
10.89 lakh textbooks distributed in Raigad; Education Department ready


रायगड, 08 जून (हिं.स.) : आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मोफत पाठ्यपुस्तक वितरणाची तयारी पूर्ण केली आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या २ लाख २५६ विद्यार्थ्यांना १० लाख ८९ हजार १९५ मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. यंदा जिल्ह्यातील ३ हजार ३८ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी शिक्षण विभागाने केली आहे.

बालभारतीकडून पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यानंतर ती तालुकास्तरीय गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या माध्यमातून संबंधित शाळांपर्यंत पुस्तके पोहोचवली जातील. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात सर्वाधिक ५४ हजार ३५८ विद्यार्थी लाभार्थी असून त्यांच्यासाठी २ लाख ९६ हजार ३ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. त्याखालोखाल कर्जत तालुक्यातील २२ हजार ५८ विद्यार्थ्यांसाठी १ लाख २४ हजार १९२ पुस्तके मागविण्यात आली आहेत. अलिबाग, पेण, उरण, खालापूर, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड आणि तळा तालुक्यांतील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके देण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजनबद्ध तयारी सुरू केली असून, वितरण प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande