वैनगंगा नदीत बोट पलटली; दोघे बेपत्ता, पाच जणांनी पोहून वाचवला जीव
भंडारा, 08 जून (हिं.स.) : भंडारा जिल्ह्याच्या मौजा करचखेडा परिसरातील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सायंकाळी झालेल्या बोट दुर्घटनेत दोन युवक नदीच्या खोल पाण्यात बुडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांनी प्रसंगावधान राखत पोहून किनारा गाठला आणि आपला
संग्रहित लोगो


भंडारा, 08 जून (हिं.स.) : भंडारा जिल्ह्याच्या मौजा करचखेडा परिसरातील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सायंकाळी झालेल्या बोट दुर्घटनेत दोन युवक नदीच्या खोल पाण्यात बुडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांनी प्रसंगावधान राखत पोहून किनारा गाठला आणि आपला जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा व पवनी परिसरातील सात मित्र रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी करचखेडा येथील वैनगंगा नदीकाठी गेले होते. नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर आंघोळ करण्यासाठी त्यांनी एका खाजगी बोटीचा वापर केला. आंघोळ आटोपल्यानंतर संध्याकाळी सुमारे 6.30 वाजता सर्वजण त्याच बोटीने परत किनाऱ्याकडे येत असताना नदीच्या मध्यभागी बोटीचा तोल गेला आणि बोट अचानक पलटली.

बोट उलटताच सर्वजण पाण्यात फेकले गेले. यामध्ये पवन मुरली चौबे आणि कृष्णा जगन्नाथ बोकडे) हे दोघे नदीच्या पाण्याच्या प्रवाहात बुडाले. तर आकाश केवट, सुबोध विलास ढोक, काशीनाथ फत्तु मेश्राम, मृनाल बाळकृष्ण मंदुकर आणि अर्जुन मोतीराम मेश्राम यांनी धाडसाने पोहत नदीचा किनारा गाठत स्वतःचे प्राण वाचवले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासन व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. नदीपात्रात बेपत्ता झालेल्या पवन चौबे आणि कृष्णा बोकडे यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नदीपात्रात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना नदीपात्रात आणि बोटींचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande