
नाशिक, 08 जून (हिं.स.) श्रमिकनगर येथील सात माऊली चौकात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ड्रेनेजच्या खोल खड्ड्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, निष्काळजी प्रशासनाविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मृत माजी सैनिकाचे नाव प्रवीण गायकवाड (वय ५४, रा. जिजामाता कॉलनी, शिवाजीनगर) असे आहे.
गायकवाड हे रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. सातमाऊली चौकातून जात असताना रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ड्रेनेजच्या खोल आणि धोकादायक खड्यात त्यांची दुचाकी अडकली. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना कार्बन नाका येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या रस्ते आणि ड्रेनेज दुरुस्तीच्या कामांदरम्यान कोणतीही सुरक्षा व्यवस्था, इशारा फलक किंवा संरक्षक बॅरिकेड्स न लावल्याने हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका माजी सैनिकाला जीव गमवावा लागला, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रवीण गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार असून, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV