अकोला : शेतकरी व उद्योजकांना कोट्यवधींची कर्ज मंजुरी
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मेगा कृषी कर्ज मेळावा उत्साहात अकोला, 08 जून (हिं.स.): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अकोला विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘देशव्यापी मेगा कृषी कर्ज पोहोच कार्यक्रम’ शनिवारी औद्योगिक वसाहतीतील हॉटेल बारोमासी ये
Photo


सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मेगा कृषी कर्ज मेळावा उत्साहात

अकोला, 08 जून (हिं.स.): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अकोला विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘देशव्यापी मेगा कृषी कर्ज पोहोच कार्यक्रम’ शनिवारी औद्योगिक वसाहतीतील हॉटेल बारोमासी येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन अनुप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार धोत्रे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गरजू शेतकरी बांधवापर्यंत कृषी कर्जाचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँकिंग क्षेत्राने अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी नमूद केले.‘बियाण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत – शेतकरी समृद्धी, बँक प्रगती’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या विशेष मेळाव्यात शेकडो शेतकरी, कृषी उद्योजक आणि व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अकोला क्षेत्रीय प्रमुख पंकज कुमार यांनी उपस्थितांचे स्वागत करत बँकेच्या विविध कृषी व आर्थिक विकास योजनांची माहिती दिली.

यावेळी बँकेच्या मुंबई मुख्य कार्यालयातील डीजीएम दिलीप बरनवाल आणि नयन सिन्हा यांनी बँकेच्या पत धोरणांबाबत मार्गदर्शन केले. विविध बँकिंग योजनांचे सादरीकरण तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शनही करण्यात आले.

कृषी व उद्योजकता विकासासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांबाबत माहिती देताना सरफराज आलम यांनी पीक कर्ज, कृषी पूरक व्यवसायांसाठीची कर्ज योजना आणि अनुदानांच्या संधींचे सविस्तर विवेचन केले.

उपविभागीय कृषी अधिकारी विवेक बिऱ्हाडे यांनी शासकीय कृषी योजना आणि बँकिंग क्षेत्रातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. तर कृषी विज्ञान केंद्रचे संचालक उमेश ठाकरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनापासून विपणनापर्यंतचा प्रवास अधिक सक्षम कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.

याशिवाय एमआयडीसी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे सचिव नितीन बियाणी यांनी कृषी-पूरक उद्योगांसाठी उपलब्ध संधींवर प्रकाश टाकला. अकोला इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल तसेच अकोला दालमिल असोसिएशनचे शांतीलाल भाल यांनी बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

मेळाव्यादरम्यान अनेक शेतकरी, नवउद्योजक, कृषी क्लस्टर्सचे सदस्य, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि डीएसए प्रतिनिधींना बँकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांच्या कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निलेश मुंधेकर यांनी केले. कृषी आणि उद्योग क्षेत्राला चालना देणारा हा मेळावा शेतकरी व उद्योजकांसाठी लाभदायी ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.

------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande