उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनीने आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
अकोला, 08 जून (हिं.स.)। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक आणि आर्थिक ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच अकोल्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उच
Photo


अकोला, 08 जून (हिं.स.)।

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक आणि आर्थिक ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच अकोल्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अकोला शहरातील भूमिका धबडघाव ही द्वितीय वर्षाची जीएनएम नर्सिंगची विद्यार्थिनी होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिने शिक्षणाची वाट निवडली होती. भूमिकाचे वडील चौकीदार म्हणून काम करतात, तर आई धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई-वडील अहोरात्र मेहनत घेत होते.

भूमिकाने नीटची परीक्षा दिली होती आणि पुन्हा परीक्षा देऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न तिच्या डोळ्यांत होते. मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिने ते स्वप्न बाजूला ठेवत नर्सिंग शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. सुरुवातीला महाविद्यालयाकडून कमी फी सांगण्यात आली होती, मात्र नंतर शुल्कात वाढ होत गेल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

आपल्या शिक्षणाचा आणि लहान भावाच्या भवितव्याचा आर्थिक भार आई-वडिलांवर पडत असल्याची चिंता भूमिकाला सतावत होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घरच्या परिस्थितीची जाणीव आणि शिक्षणासाठीचा वाढता खर्च यामुळे ती मानसिक तणावात होती, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वाढता खर्च हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षण हे हक्काचे असताना आर्थिक अडचणींमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे स्वप्न आणि आयुष्य दोन्ही संपुष्टात येणे ही समाजासाठी चिंतेची बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande