
रस्ता सुरक्षा, मराठी भाषा प्रशिक्षण आणि शासन योजनांच्या जनजागृतीवर भर
अकोला, 08 जून (प्रतिनिधी): राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहनाची पाहणी करून त्याच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली. या वाहनाद्वारे रस्ता सुरक्षा विषयक जनजागृतीसह ऑटोचालकांना मराठी भाषेच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी जाणून घेतले.
यावेळी मंत्र्यांनी ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहनाच्या माध्यमातून ऑटोचालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच ‘पीएम राहत’ आणि ‘राहवीर’ योजनांबाबत व्यापक जनजागृती करण्यासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रसार करण्यावरही भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महाराष्ट्रात केवळ अकोला जिल्ह्यात अशा प्रकारे ‘रोड सेफ्टी व्हिजन’ व्हॅनच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगत मंत्र्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यासाठी त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्याची प्रशंसा केली.
या उपक्रमामुळे रस्ता सुरक्षा विषयक जागरूकता वाढण्यास, मराठी भाषेच्या वापराला प्रोत्साहन मिळण्यास आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
-------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे