
पुणे, 08 जून (हिं.स.)।संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान आळंदीतील रानवडे कुटुंबीयांना बैलजोडी निवड समितीने दिला आहे. मात्र, यासंदर्भात आळंदी देवस्थानकडून अद्याप अधिकृत पत्र किंवा घोषणा करण्यात आलेली नसल्याने या निवडीबाबतचा संभ्रम कायम आहे.संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यानंतर ९ जुलैला पालखी पुण्याकडे मार्गस्थ होताना ती रथामध्ये विराजमान केली जाते. या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.हर्षवर्धन रानवडे यांनी कर्नाटकातून खिल्लारी जातीची ‘भीम-अर्जुन’ ही बैलजोडी सुमारे साडेसहा लाख रुपयांना खरेदी केली आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून या बैलांकडून शेतीची कामे करून घेतली जात असून त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.तसेच तुळशीराम रानवडे यांनी हिंजवडी येथून ‘रामा-सूर्या’ ही बैलजोडी सुमारे सव्वासहा लाख रुपयांना खरेदी केली आहे. दोन्ही कुटुंबांकडून बैलांना डाळ, गूळ, गव्हाचे पीठ, पेंड आदी पौष्टिक खुराक दिला जात असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे.दरम्यान, बैलजोडी निवड समितीने मान जाहीर केला असला तरी आळंदी देवस्थानाकडून अधिकृत पत्र न मिळाल्याने पालखी रथासाठी अंतिम निवड कोणत्या बैलजोडीची होणार, याबाबत उत्सुकता कायम आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु