
लातूर, 08 जून (हिं.स.)।
: रेणापूर पोलिसांनी तत्पर तपास करत घरफोडी चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणला असून, चोरीस गेलेला ६ लाख ६० हजार ५०० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती आज देण्यात आली
शेख जियाउद्दीन वलीयोद्दीन (वय ५५, रा. सराया गल्ली, रेणापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या शेतातील आकाड्यावर असलेल्या पत्र्याच्या खोलीतून लोखंडी बॉक्स, लोखंडी अँगल व इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.
दि. ३ जून रोजी रात्री १० ते दि. ४ जून रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान ही चोरी झाली होती. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची हालचाल शोधून काढण्यात आली.
तपासादरम्यान आरोपी चोरीचा माल विक्रीसाठी पिंपळफाटा परिसरातील एका भंगार दुकानाजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी प्रविण प्रकाश आडे (२२), सूरज विनायक चव्हाण (१९), विजय सुरेश चव्हाण (२१) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून १ एचपी पाण्याची मोटार, वॉशिंग मशीन, लोखंडी बॉक्स, सुमारे १.५० लाख रुपये किंमतीचे १० लोखंडी अँगल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन असा एकूण ६ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून चोरीस गेलेला संपूर्ण माल हस्तगत करण्यात रेणापूर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दिघे तसेच पोलीस अंमलदार विपिन मामडगे, परमेश्वर शेळगे, पंडगे आणि अनंत वाड यांच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis