चुडावा येथे प्रस्तावित रेल्वे कारखाना रद्द करा -ग्रामस्थ, शेतक-यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन
परभणी, 08 जून (हिं.स.)। पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील गट क्रमांक २७१ व २६५/१ मधील सुमारे १५.५ एकर कृषी जमिनीवर प्रस्तावित रेल्वे सिमेंट स्लिपर उत्पादन प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी नागरिका
चुडावा येथे प्रस्तावित रेल्वे कारखाना रद्द करा  -ग्रामस्थ, शेतक-यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन


परभणी, 08 जून (हिं.स.)।

पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील गट क्रमांक २७१ व २६५/१ मधील सुमारे १५.५ एकर कृषी जमिनीवर प्रस्तावित रेल्वे सिमेंट स्लिपर उत्पादन प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रस्तावित प्रकल्पामुळे परिसरातील सुपीक शेती, भूजलसाठे, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सिमेंट धूळ, औद्योगिक उत्सर्जन, जड वाहनांची वाहतूक आणि भूजलाचा वाढता वापर यामुळे शेतीचे उत्पादन घटण्याबरोबरच जमिनीची सुपीकता आणि शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येऊ शकते. ग्रामस्थांच्या मते, चुडावा, सोनखेड (मोठी पांढरी), वाई, ढोणे पांगरा, गोविंदपूर व परिसरातील अनेक गावे कृषीप्रधान असून हजारो नागरिकांचे जीवन शेती व पशुपालनावर अवलंबून आहे. त्यामुळे या परिसरात कोणत्याही प्रदूषणकारी उद्योगास परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावित रेल्वे स्लीपर कारखान्यासाठी सुरू असलेली बिगरशेती प्रक्रिया, पर्यावरणीय मंजुरी व इतर सर्व परवानग्या तात्काळ स्थगित करून संपूर्ण प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, प्रकल्पासंदर्भातील जमीन व्यवहार, मंजुरी प्रक्रिया व इतर बाबींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकमुखाने या प्रकल्पाला विरोध दर्शवित प्रशासनाने जनभावनेचा आदर करून प्रस्तावित रेल्वे स्लीपर कारखाना कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande