
छत्रपती संभाजीनगर, 08 जून (हिं.स.)।
'ग्रीन महाराष्ट्र मिशन' (हरित महाराष्ट्र) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा हरित चेहरा बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आगामी १० वर्षांत जिल्ह्यातील शासकीय पोटखराब २१,९४० हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे .विविध विभागांच्या समन्वयातून हे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी सामाजिक वनीकरण विभागास दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित हरित आयोगाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वृक्ष लागवडीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी. एम, प्रादेशिक वन अधिकारी सुवर्णा माने, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, वृक्षारोपणासाठी केवळ वनविभागाच्या जमिनीवर अवलंबून न राहता, शासकीय पडीक ,पोटखराब जमीन, खाजगी कमी दर्जाची जमीन, जलसंपदा विभागाचे क्षेत्र, उद्योग विभाग, कृषी विभाग आणि महानगरपालिका यांच्या अखत्यारितील मोकळ्या जागांचा वापर करण्यात येणार आहे. जमिनीच्या उपलब्धतेनुसार क्षेत्रनिश्चित केले जाईल.याचे नियोजन वन विभाग आणि संबंधित यंत्रणेला करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.सामाजिक वनीकरण, कृषी आणि वनविभागाच्या नर्सरीमधून दर्जेदार रोपांचा पुरवठा केला जाणार आहे.वृक्षारोपणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जलसंधारण, रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत आणि जिल्हा रेशीम कार्यालय यांच्याशी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
संबंधित विभागाने वृक्ष लागवडीसाठी योग्य जागांचे तातडीने नियोजन करावे, जेणेकरून पावसाळ्याच्या काळात लागवडीचे काम गतीने पूर्ण होईल. यावर्षी पावसाचे पाणी कमी असणार आहे . याचा नियोजनात विचार करुन अधिकचे उद्दिष्ट पुढील काही वर्षात नियोजित करावे. जेणेकरून वृक्ष जतन करण्यासाठी उपयोग होईल.
हरित महाराष्ट्र मिशन' हे केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नसून, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे हे याचे मुख्य ध्येय आहे. १० वर्षांचा कालावधी असल्याने, लागवड केलेल्या रोपांचे संवर्धन , जतन करण्याची जबाबदारीही संबंधित विभागांवर सोपवण्यात आली आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील हरित पट्ट्यात मोठी भर पडणार असून, निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड आणि संगोपनात सहभागी होणे आवश्यक आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis