
लातूर, 08 जून (हिं.स.)। डेंग्यु ताप प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने लातूर शहर महानगर पालिकेमार्फत
८ ते २० जून या कालावधीमध्ये आयुक्त मानसी यांच्या सूचनेनुसार तसेच उपायुक्त वसुधा फड यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शहरात ॲबेट मोहीमेचा पहिला राउंड राबविण्यात येत आहे. शहरातील एकूण अपेक्षीत घरसंख्या ७७ हजार ५९७ आहे. या सर्व घरामध्ये कंटेनर तपासणी करुन डास अळी आढळून आलेल्या कंटेनरमध्ये ॲबेट टाकण्यात येणार आहे व आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
डेंग्यु हा आजार एडिस एजिप्ती या डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होतो. या डासाची उत्पती रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कुलर्स, कारंजे, फलदाण्या इत्यादी ठिकाणच्या स्वच्छ पाण्यात होते. घराभोवतालच्या परिसरात अडगळीच्या वस्तुमध्ये विशेषतः जुन्या टायर्समध्ये साठवलेल्या पाण्यात हे डास वाढतात.
घराभोवती ज्यामध्ये पावसाचे पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू ठेवू नये, त्या नष्ट कराव्यात. फुलदाणी, कुंडी इत्यादीतील पाणी नियमित बदलावे. परिसरातील डबकी वाहती करावी. नाले स्वच्छ करावेत. ड्रम किंवा इतर पाण्याची भांडी पुर्णपणे रिकामी करावीत. स्वच्छ धुतल्या नंतर भरून झाकण लावावे. या २ महिन्याच् या कालावधीमध्ये आवकाळी पाऊस पडून त्याचे पाणी साचुन राहण्याची शक्यता असते, त्यामुळे शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, सार्वजनीक संस्थांच्या इमारती इत्यादी आस्थापनांनी त्यांच्या इमारती व परिसरामध्ये पाणी साचुन राहणार नाही यांची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
या मोहिमेत एकूण ८ नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. यासोबतच ताप रुग्ण सर्वेक्षण करून, ताप असणाऱ्या रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. तरी अबेट मोहिमेत घर भेटीस येणा-या आरोग्या कर्मचा-यास सहकार्य करावे असे आवाहन डॉ. शंकर भारती वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा लातूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis