

बारामती, 08 जून (हिं.स.) - कोणताही गाजावाजा आणि पूर्वसूचना न देता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छतेची स्थिती, औषधांचा पुरवठा तसेच एकूण व्यवस्थापनाची सखोल माहिती घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत जबाबदारीने व तत्परतेने काम करण्याच्या सूचनाही दिल्या. रुग्णालयाची पाहणी करताना सुनेत्रा पवारांना काही ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. त्यावेळी तेथील कर्मचारी महिलांना त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं. ही काय घाण आहे, इथं उशी पडलेली दिसतेय. काय करता दिवसभर, फक्त मोबाईल बघता का? अशा शब्दात सुनेत्रा पवारांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच, येथील डॉक्टरांसह अधिकाऱ्यांनाही दम भरला. रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. आरोग्य सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम सुनेत्रावहिनी करत असल्याचे या भेटीतून पुन्हा एकदा दिसून आले. जनतेच्या प्रश्नांबाबतची तत्परता, कामातील शिस्त आणि प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याची पद्धत यामुळे आज अनेकांना त्यांच्यामध्ये अजितदादांचे प्रतिबिंब दिसत आहे. आगामी काळात बारामतीच्या आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक आणि लोकाभिमुख बदल घडवून आणण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
“तुम्ही सर्वजण आता लगेच कामाला लागा. तुम्हाला हा कचरा कचराकुंडीत टाकायला त्रास होतो का? तुम्हाला जास्त काम असतं का? ही अशी स्वच्छता असते का? तुम्ही दिवसभर काय करत असता? फक्त मोबाईल पाहता का? हे येथे ओषधे पडलेत, काय आहे हे? स्वच्छता कशाला म्हणतात? तुमचं नाव काय आहे? ये या सर्वांची नावं लिहून घ्या. हे तात्काळ स्वच्छता करायला सांगा. या कर्मचाऱ्यांना काही काम नाही का, त्यांच्याकडे आयकार्ड दिसत नाहीत. आम्हाला अनेक रुग्णांच्या तक्रारी आलेल्या आहेत”, अशा कडक शब्दांत सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना झापलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी