बीड-हिंगोलीत सैन्याची हरितक्रांती; सव्वा लाख वृक्षांचे यशस्वी संगोपन
बीड, 08 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या १३६ टी.ए. बटालियनने बीड आणि हिंगोली जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या या सैनिकांनी आपल्या श्रमदानातून दोन
बीड-हिंगोलीत सैन्याची हरितक्रांती; सव्वा लाख वृक्षांचे यशस्वी संगोपन


बीड, 08 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या १३६ टी.ए. बटालियनने बीड आणि हिंगोली जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या या सैनिकांनी आपल्या श्रमदानातून दोन वर्षांपूर्वी उजाड माळरानावर तब्बल सव्वा लाख वृक्षांची लागवड केली होती. योग्य नियोजन आणि अथक परिश्रमांच्या बळावर आज या झाडांचे यशस्वी संगोपन करून सैनिकांनी या भागात मोठी हरितक्रांती घडवून आणली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि वनविभागाच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत सुरुवातीला ७० सैनिकांनी श्रमदान केले होते, तर सध्या ३० सैनिक नियमितपणे या झाडांची काळजी घेत आहेत. सैनिकांच्या या अनोख्या उपक्रमाचे पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

या मोहिमेसाठी धारूर येथील पोलिस ठाण्याच्या पाठीमागील सुमारे ३ हेक्टर उजाड गायरान क्षेत्राची निवड करण्यात आली होती, जेथे १० हजार झाडे लावण्यात आली. तसेच घागरवाडा परिसरातील १८५ हेक्टर क्षेत्र निश्चित करून तेथे सव्वा लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी झाडांना पाणी देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. धारूर येथे किल्ल्याच्या विहिरीतील पाण्याचा वापर केला जात असून, घागरवाडा येथे साठवण तलावावर १० एचपी क्षमतेचा पंप बसवून पाणीपुरवठा केला जात आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणाऱ्या सैनिक तुकडीचे प्रमुख कृष्णा जाधव यांनी सांगितले की, सध्या या झाडांची सैनिकांमार्फत व्यवस्थित जोपासना सुरू असून आगामी काळात आणखी वृक्षारोपण केले जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande