रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा भाजप कार्यालयाला घेराव
Farmers affected by Ring Road besiege BJP office
Farmers affected by Ring Road


Farmers affected by Ring Road


न्याय्य मोबदला आणि संयुक्त बैठकीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार

नाशिक, 08 जून (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आज सहकुटुंब आणि सहपरिवार शहरातील भाजपच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयाला घेराव घालत तीव्र आंदोलन सुरू केले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांसोबत बैठकीचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

रिंग रोड प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत त्रुटी, अन्यायकारक मोबदला आणि विविध प्रलंबित तक्रारींबाबत शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चार बैठका झाल्या असून, मंत्री छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानीही आंदोलन करण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे संपादित जमिनींसाठी सध्याच्या बाजारभावानुसार योग्य मोबदला देणे, सर्व तक्रारींचा गांभीर्याने विचार करणे आणि या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणे. यासाठी गिरीश महाजन, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, दादा भुसे, जिल्हा प्रशासन, संबंधित अधिकारी आणि रिंग रोड बाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी दिवसभर भाजप कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनस्थळीच भोजन घेत त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली.

यावेळी आंदोलनाला मार्गदर्शन करताना छावा क्रांतिवीर सेनाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर म्हणाले, “हे कोणत्याही राजकीय पक्षाचे आंदोलन नसून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीचा लढा आहे. विकासाला आमचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचे धोरण आम्ही सहन करणार नाही. शासनाने तातडीने बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढावा. न्याय मिळाल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाहीत.”

ते पुढे म्हणाले की, राजकीय कार्यक्रमांसाठी वेळ मिळतो, मात्र अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारबाबत नाराजी वाढत आहे. आरोप-प्रत्यारोपांऐवजी संवादातून प्रश्न सोडवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सरोज आहेर यांनीही उपस्थिती दर्शविली. त्यांनी गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शेतकऱ्यांना भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली. वेळ देण्याचे आश्वासन मिळाले असले तरी दिवसभरात कोणतीही बैठक निश्चित न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सर्व संबंधितांची संयुक्त बैठक बोलावण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. तसेच या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस शासन आणि प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला.

------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande