
रायगड, 08 जून (हिं.स.)कर्जतमधील कुशीवळी येथील एआय युनिव्हर्सिटी प्रकल्पात कार्यरत कामगारांनी पगारवाढीच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. अनेक वेळा मागणी करूनही वेतनवाढीबाबत कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने कामगारांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अप) रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पाठिंबा दर्शवत उपोषणस्थळी भेट दिली. कामगारांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. कामगारांच्या मागण्या आणि व्यवस्थापनाची भूमिका जाणून घेत प्रशासनाच्या माध्यमातून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)